NATURE Education Activities at DAPOLI (Marathi)

दापोली आणि परिसरातील

निसर्ग परिचय उपक्रम

शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही कॉप्स नर्सरी गव्हे दापोली येथे आयोजित केलेल्या कार्यानुभव कार्यक्रमाच्या यशानंतर आता आम्ही आमच्या दापोली आणि परिसरातील निसर्ग परिचय उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती देत आहोत.

सहजपणे आणि हसत खेळत निसर्ग परिचय असा हा २ – ३ किंवा ५ दिवसांचा कार्यक्रम दापोली येथे होऊ शकतो. आपली प्रवास, निवास व भोजन व्यवस्था आपणच करायची असून साधारणपणे १५ ते २० जणांचा गट योग्य ठरेल.  आपण आपल्या परिचित व्यक्तींना  किंवा काही विद्यार्थी व पालकांना एकत्रितपणे या उपक्रमासाठी आमंत्रित करू शकता. दापोली येथे सुखरूपपणे पोहोचणे आणि सर्व कार्यक्रम चांगल्याप्रकारे अनुभवून सुखरूपपणे आपापल्या स्थळी परत जाणे हे आपल्यापैकी कोणीतरी कुशल नेतृत्व करू  शकेल हे आपण पहालच. त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा आपण योग्य प्रकारे विचार करून ह्या कार्यक्रमाचे नियोजन करू शकता.

कोणत्याही शनिवार / रविवारी किंवा आपल्या सोयीनुसार कधीही – उदा. – दिवाळी किंवा नाताळच्या सुट्टीत देखील ह्या कार्यक्रमाचे नियोजन आपण करू शकाल. आम्ही खालील टेबल मध्ये दिलेले उपक्रम आपल्यासाठी करण्यास उत्सुक आहोत. आपण दापोली किंवा परिसरातील गावांमध्ये आपल्या सोयीच्या ठिकाणी राहू शकता. आपला संपूर्ण प्रवास, राहणे, जेवणे व दापोली परिसरातील फिरणे हे सर्व आपल्यालाच करावयाचे आहे. आम्ही फक्त खालील कार्यक्रम आपणासाठी देऊ. ह्या कार्यक्रमांच्या आमच्या मानधनासाठी कृपया  आमच्याशी संपर्क साधावा.

एकूणच हा अनुभव सुखावह होण्यासाठी खालील काही गोष्टी लक्षात घेतल्यास बरे होईल.

  • येथे येताना प्रत्येकाने  आपापल्या गरजेनुसार आवश्यक ते साहित्य – उदा. – लोकरीचे कपडे, blanket, torch etc. साहित्य आपल्या सोबत आणावे.
  • camera, द्विनेत्री आणि इतर मौल्यवान साहित्य आपापल्या जबाबदारीवरच आणावे.
  • आमच्या विविध कार्यक्रमांपैकी एका कार्यक्रमामध्ये आपण समुद्रकिनारी चालणार आहोत पण त्यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये जायची परवानगी नाही कारण ते धोकादायक ठरू शकते.
  • १५ / २० जणांच्या समूहामध्ये एकत्र राहताना, राहण्याचे ठिकाण आणि इतर  सोयींच्या बाबतीत ( रहायची जागा, पाणी, जेवण इत्यादी) समजून आणि जुळवून घ्यावे लागू शकते.
  • वरील सूचनांप्रमाणेच  आपल्या सर्वांच्या सुरक्षित आणि आरामदायक अशा अनुभवासाठी आपणही आवश्यक अशा गोष्टी वेळोवेळी सर्वाना सांगाव्या.
  • शहरातील गजबजाटातून ३ / ४ दिवसांसाठी आपण जेव्हा शांत आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी जातो तेव्हा आपण सर्वांनी शांत राहून निसर्गाची शांतता तर कधी ऐकू  येणारे निसर्गाचे संगीत अनुभवण्याची तयारी ठेवायला हवी. आपण शांत राहून निसर्गाकडून खूप काही शिकू आणि अनुभवू शकतो.

आमचा कार्यक्रम हा माणसाच्या निसर्गाशी असलेल्या नात्याचे अंतरंग उलगडून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. जर आपल्याला निसर्ग जाणून घ्यायचा असेल तर निसर्गात जायला हवं. यामध्ये निसर्ग जाणून घेणे किंवा निसर्गाबद्दल काही गोष्टी शिकणे  हा एक भाग आहे. आपणही निसर्गाचा एक घटक आहोत,  एक व्यक्ती म्हणून आपण निसर्ग  संवर्धनामध्ये काय करू शकतो हे जाणून घेण्यासाठी हा एक उपक्रम आहे.

अनु क्र उपक्रम  आणि कालावधी नियोजित ठिकाण उपक्रमाचा तपशील
निसर्ग भ्रमण(१ – १.५ तास) दापोली आणि परिसरातील कोणतेही योग्य  गाव चालेल सकाळी लवकर ७:०० ते ८:३०जास्तीत जास्त २० जणांचा समूह
खारफुटी वनांचा परिचय(१ – १.५ तास) आंजर्ले किंवा केळशी जवळील उतंबर गाव दिवसभरात कोणत्याही वेळी(शक्यतो दुपारची कडक उन्हाची वेळ सोडून)जास्तीत जास्त २० जणांचा समूह
शेतीला / बागेला भेट(१ – १.५ तास) दापोली आणि परिसरातील कोणतेही योग्य गाव चालेल दिवसभरात कोणत्याही वेळीजास्तीत जास्त ३० जणांचा समूह
रोपवाटिकेला भेट – फेरफटका आणि विविध प्रात्यक्षिके(२ –  २.५  तास) कॉप्स नर्सरी गव्हे – दापोली नर्सरीमध्ये विविध प्रकारच्या झाडांची ओळख. प्रात्यक्षिकासाठी साहित्य पुरविले जाईल परंतु यापैकी कोणत्याही गोष्टी आपल्याला बरोबर नेता येणार नाहीत.जास्तीत जास्त ३० जणांचा समूह
रोपवाटिकेत फेरफटका(१ तास) कॉप्स नर्सरी गव्हे – दापोली नर्सरीमध्ये फेरफटका आणि विविध प्रकारच्या झाडांची ओळख.जास्तीत जास्त ३० जणांचा समूह
रोपवाटिकेत  कार्यानुभव आणि विविध प्रात्यक्षिके(१ – १.५ तास) कॉप्स नर्सरी गव्हे – दापोली बी बियाण्याची पेरणी, रोपांची लागवड आणि विविध प्रात्यक्षिके. कार्यानुभवासाठी साहित्य पुरविले जाईल परंतु यापैकी कोणत्याही गोष्टी आपल्याला बरोबर नेता येणार नाहीत.जास्तीत जास्त ३० जणांचा समूह
स्लाईड शो / व्याख्यान(१ तास) आपण राहत असलेले ठिकाण पर्यावरण विषयक विविध विषय. प्रोजेक्टर आपल्याला उपलब्ध करावा लागेल. हि सुविधा आमच्याकडे नाही. तसेच विजेची उपलब्धताही लक्षात घ्यायला हवी.जास्तीत जास्त ५० जणांचा समूह
पर्यावरणीय खेळ(१ – १.५ तास) आपण राहत असलेले ठिकाण दिवसभरात कोणत्याही वेळीजास्तीत जास्त २० जणांचा समूह.
 ९ निसर्गाची / निसर्गातील काही घटकांची चित्रे काढणे आणि रंगवणे(१ – १.५ तास) आपण राहत असलेले ठिकाण आवश्यक ते साहित्य (कागद, रंग इ.) आम्ही पुरवू. रंगवलेली चित्रे आपण घेऊन जाऊ शकता.जास्तीत जास्त २० जणांचा समूह.


NATURE Education Activities at DAPOLI

Further to overwhelming response from most of you towards our “hands on experience” session for school children at Kop’s nursery, Dapoli, we are detailing salient features of the Nature Education Activities to be experienced at & around DAPOLI.

In keeping with the objectives of Learning as you Relax, we can suggest a 2 or 3day stay at DAPOLI. You may find options for lodging & boarding for the group from internet OR we can suggest some, if you feel so.  A group of 15 to 20 persons would be ideal but we could stretch up to 25 people. If you are interested in bringing a group of students you can manage the same with appropriate responsibility. OR it may be a group of interested parents & children. This can be planned during week ends as well as during forthcoming Diwali and Christmas holidays.

Besides each one’s Personal Effects, items like Woolens, torch, sleeping bags etc. would make the trip more comfortable.

However we must stress that:

Binoculars, camera & any other valuable items should be brought at your own risk.

One of our sessions include a walk along the sea shore, nobody will be allowed to go in the sea as it is dangerous.

Participants should be informed that they should develop a Camp Attitude, where adjustment to other members of the group, food, water and general living facilities may not be to individual tastes.

All Instructions given by us should be followed while on the trail esp. in the Forest.

In addition to our guidelines, you can include your disciplinary instructions for the participants.

As we are all used to a noisy and lively action in the Metropolis, all Participants should be requested to enjoy nature’s experience in SILENCE and try to maintain this silence throughout the trip.  This will help them experience and practice NATURE’S relaxation techniques.

It is a fact that if one has to know nature one has to be with nature. This event will aim to give broad idea about nature & its functioning along with man’s co-relation to nature. It will be holistic approach to look at nature & our individual roles in nature’s conservation; this will be the main objective of the event.

We look forward to your continued interest and participation.

Glimpses of Monsoon from Dapoli – Anjarle

नेमेचि येतो मग पावसाळा …….. असे जरी म्हटले जात असले तरी दर वर्षीचा पावसाळा हा नव्या रूपातच येतो आणि म्हणूनच आपण दर वर्षी चातकासारखी त्या पावसाची वाट पाहतो. तो आला की त्याला एखाद्या उत्सवासारखा वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतो – कधी चिंब भिजून, तर कधी रिमझिम पावसाकडे खिडकीतून बघून, कधी चमचमीत पदार्थ खाऊन तर कधी पावसात सहलीला जाऊन …. अशा एक ना अनेक प्रकारे आपल्यातला प्रत्येक जण पाऊस अनुभवत असतो. पण फक्त आपणच पाऊस अनुभवतो असे नाही. पावसाच्या सुरुवाती बरोबरच गवत उगवायला लागते, काही पावसाळी वनस्पती आपले अस्तित्व दाखवू पाहतात, शेतकरी बैल जुंपून कामाला लागतो, पक्षी साचलेल्या पाण्यात डुंबताना दिसतात, पावश्यासारखे पक्षी पाऊस येणार याची सूचनाच जणू जोरजोरात ओरडून देतात,
मोराच्या नाचण्याचे सौंदर्य पावसामुळे अधिक मोहक वाटते …… अशा कितीतरी गोष्टी निसर्गात घडत असतात ……. त्यातल्या फार कमी गोष्टींची दखल आपण घेतो.

पावसाळ्यात बहरणाऱ्या वनस्पती बघितल्या तर कळते की निसर्गाने सभोवताली कशी रंगांची उधळण केली आहे. पण आपण त्या दृष्टीने बघितले तरच हे रंग आपल्याला आनंद देऊ शकतात. एकाच रंगाची पण ३ / ४ प्रकारची फुले जरी बघितली तरी लक्षात येते की प्रत्येक फुलाची रचना वेगळी, रंगछटाही वेगळी, उमलण्याची पद्धत आणि वेळही वेगळी……. एवढे वैविध्य आणि एवढे बारकावे…… क्षणभर थक्कच व्हायला होते.

ह्या सर्व प्रकारच्या वनस्पतींबरोबर आपल्याला विविध प्रजातींच्या अळंबी, कीटक आणि फुलपाखरेही पाहायला मिळतात. दापोली – आंजर्ले परिसरातील आम्ही अनुभवलेली निसर्गाच्या काही रंगांची झलक आम्ही येथे दाखवत आहोत …… आपल्यासाठी हा अनुभव आनंददायी असा होवो हीच शुभेच्छा …….

It all starts with few raindrops ….. growing of grass, sprouting of monsoon flora which was lying dormant in the form of seed, rhizome, bulb etc., throughout the
hot season, farmers tilling the soil, birds calling, waterfalls energizing everyone, nature splashing its colours in the form of flowers ……. different shades and hues of the same colour, the delicacy of flower structure ….. all these make us go amazed. It makes us wait for the rainy season every year …. even though it rains every year, it is different every year.

Monsoon flora is nature’s miraculous feature. The otherwise dormant seed /
rhizome suddenly sprout with falling raindrops. They grow quickly and within a month or so start flowering followed by shedding of mature seeds for assuring next year’s sprouting. They dry up after monsoon…..they come with monsoon and go with monsoon. Their beauty can be enjoyed only during the monsoon season. May you enjoy this article as well as glimpses of the nature’s colours that we have experienced at and around Dapoli – Anjarle.

Global Kokan 2011 (Marathi)

ग्लोबल कोकण २०११ प्रदर्शनाच्या निमित्तानं………

कृषिवरदा  – दापोली निसर्ग भ्रमण

आंजर्ले – दापोली  परिसरात येणाऱ्या पर्यटकांना इथल्या निसर्गाचा एक अनुभव देण्याचा प्रयत्न निसर्ग भ्रमण  कार्यक्रमातून  केला जातो. या कार्यक्रमात भ्रमण मार्गात असणाऱ्या वनस्पती, दिसणारे पक्षी, फुलपाखरे, कीटक, कोळी इ. ची माहिती देण्यात येते . पर्यावरण व इतर नैसर्गिक स्त्रोतांच्या संवर्धनाबाबत मानवाची भूमिका उलगडून सांगणे हा या निसर्ग भ्रमण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

खरंतर  कृषि  व पर्यावरण विषयक तांत्रिक सल्ला देणं आणि मार्गदर्शन करणं हा आमचा व्यवसाय. माझी पत्नी जिल्पा आणि मी गेली १० वर्ष हा व्यवसाय करीत आहोत. पण ह्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आम्ही जिल्पाच्या निसर्ग भ्रमण दापोली या कार्यक्रमाला प्राधान्याने सर्वांपर्यंत पोहोचविण्याचं  ठरवलं आणि कामाला सुरुवात केली.

जिल्पा मुळची मुंबईची. तिथे असताना तिने १९९८ सालापासून निसर्ग भ्रमणाचे कार्यक्रम व्यावसायिक स्वरुपात घ्यायला सुरुवात केली. २००७ साली दापोलीला स्थायिक झाल्यानंतर असे कार्यक्रम दापोली परिसरात आम्ही घेत होतो. पण त्याचे स्वरूप अगदी लहानसेच – म्हणजे ओळखीतून येणाऱ्या हौशी निसर्ग प्रेमी आणि अभ्यासकांसाठी निसर्ग भ्रमण – असे होते. गेले वर्षभर आम्ही या कार्यक्रमाच्या व्यावसायिक स्वरुपाची आखणी व नियोजन करीत होतो. आणि त्याच सुमारात आमची दापोलीचे प्रांत अधिकारी श्री. मंगेश जोशी यांच्याशी ओळख झाली. ते स्वतः निसर्गप्रेमी असल्यामुळे त्यांना ही  कल्पना खूपच आवडली. “दापोलीला पर्यटकांची खूपच गर्दी असते आणि आपल्या तालुक्यातील विविध पर्यटन स्थळे पाहत असतानाच  इथल्या  निसर्गाची आणि जैवविविधतेची ओळख तुम्ही पर्यटकांना करून द्या” असे त्यांनी सुचवले.

या कार्यक्रमाचा व्यावसायिक दृष्ट्या विस्तार करण्याचा विचार मनात असतानाच श्री. जोशी साहेबांच्या भेटीमुळे आमचं मनोबळ वाढलं. मी आधीच माझ्या भावाशी काही गोष्टींची चर्चा केली होती आणि त्यानंतर आमचे दापोलीतील कौटुंबिक मित्र श्री. सौरभ बोडस यांच्याजवळ या विषयीची सविस्तर चर्चा केली आणि विशेषत्वाने त्यांच्याकडून या प्रकल्पाच्या  व्यवस्थापना विषयी  मार्गदर्शन घेतलं. त्यानंतर जानेवारी २०११ पासून निसर्ग भ्रमण कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टीने विस्तार करायचं  निश्चित   केल.  आमची वेबसाईट तयार करणाऱ्या श्री. विक्रम कुलकर्णीबरोबर (www.vikcon.in) बोलून आणि एकत्र बसून माहितीपत्रकाचे स्वरूप ठरवून घेतलं. त्यासाठी त्याला आवश्यक  ती माहिती आणि आम्ही काढलेले फोटोही दिले.  त्याने तत्परतेने अतिशय आकर्षक असं माहितीपत्रक आणि भित्तीपत्रक तयार केलं. या माहितीपत्रकाची एका विशिष्ठ पद्धतीने घडी करता येते  की ज्यायोगे ते बघणाऱ्या व्यक्तीस ते हातात घेऊन पाहण्याचा आणि वाचण्याचा मोह टाळता येत नाही.  माहितीपत्रके  आणि  भित्तीपत्रके  छापून  झाल्यावर आंजर्ले – दापोली परिसरातील हॉटेल व घरगुती पर्यटनाची सुविधा असलेल्या काही  ठिकाणी व्यावसायिक जाहिरात करायला सुरुवात केली.

दापोली- मुरुड परिसरातील एक हॉटेल व्यावसायिक मित्र श्री. शैलेश मोरे (www.beachresortsilversand.com) यांच्याकडून आम्हाला ग्लोबल कोकण २०११ (www.globalkokan.com) प्रदर्शनाची  माहिती मिळाली. तेव्हाच आम्ही या प्रदर्शनात सहभागी होण्याचं  निश्चित केलं. आणि कोकण भूमी प्रतिष्ठानच्या (www.kokanbhumi.com) कार्यालयामध्ये जाऊन सौ. यादवराव आणि श्री. सचिन कोठारकर यांच्याशी चर्चा केली. प्रदर्शनाविषयी पूर्ण माहिती घेतली तसेच त्यादृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व  बाबींची पूर्तता करून आमचा प्रदर्शनातील सहभाग निश्चित केला.

दि. २४ ते २७ फेब्रुवारी २०११ या दिवसांमध्ये मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स  येथे झालेल्या या  प्रदर्शनात आम्हाला लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आम्हाला भेटणाऱ्या सर्वांना आम्ही आमचे माहितीपत्रक देत होतो. त्यापैकी बऱ्याच लोकांनी आमच्या ‘निसर्ग भ्रमण – दापोली’ कार्यक्रमाचं स्वरूप नीटपणे समजून घेतलं  आणि त्यांना ही संकल्पना खूप आवडल्याचं  आवर्जून नमूद केलं. आमच्या माहितीपत्रकातील आमची शैक्षणिक पदवी वाचून काहींनी आमच्या कृषिविषयक व्यवसायाचीही चौकशी केली. आमच्या कृषि व पर्यावरण विषयक तांत्रिक मार्गदर्शनाची  आमची कार्यपद्धती त्यांना  फारच चांगली वाटली. काहींनी आमच्या या दोन्ही उपक्रमांनी भारावून जाऊन आमचे कौतुक केले तसेच आमच्या या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.

कोकण भूमी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने आमच्यासारख्या कोकणातील उद्योजकांना जाहिरातीसाठी एक चांगलं   व्यासपीठ मिळालं. ग्लोबल कोकण या प्रदर्शनाचं नियोजन फारच चांगल्याप्रकारे केलं होतं. कोकण भूमी प्रतिष्ठानचे श्री. संजय यादवराव तसेच प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही आभारी आहोत.  आम्ही तर आमची माहितीपत्रके सर्वांना दिलीच परंतु प्रतिष्ठानने तयार केलेल्या एकत्रित माहिती पत्रकातूनही सहभागी झालेल्या व्यावसायिकांची माहिती आयोजकांनी सर्व लोकांपर्यंत पोहोचविली. अशाप्रकारे एकत्रित माहितीपत्रके तयार करण्याची  प्रतिष्ठानची संकल्पना नक्कीच स्तुत्य आहे कारण ती सर्वांना एकत्रितपणे पुढे नेणारी अशी आहे.